लातूर- चाकूर पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत मारापल्ले यांचा मुलगा धंनजय याने डोक्यात फरशी मारल्यानेच मृत्यू झाला आहे. मारहाणीचा हा सर्व प्रकार धनंजय याच्या मुलानेच चुलत आजोबाला सांगितला. यावरून माजी सभापतींच्या मृत्यूचे गूढ उलगडले असून धनंजय मारापल्ले याला अटक करण्यात आली आहे.
घराच्या आणि शेताच्या वाटणीवरून चंद्रकांत मारापल्ले आणि मुलगा धनंजय मारापल्ले यांच्यात सातत्याने भांडण होत होते. गेल्या काही दिवसांपासून धनंजय, त्याची पत्नी आणि मुले ही विभक्त राहत होती. मात्र, एक मुलगा नोकरीनिमित्ताने बाहेर गावी असतो मग कशाला वाटणी, असे म्हणत चंद्रकांत मारापल्ले हे वेळ निभावून घेत होते. मात्र, शुक्रवारी दारूच्या नशेत असणाऱ्या धनंजय याने चंद्रकांत यांच्या डोक्यात फरशी घातली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.
दरम्यान, धनंजय याच्या मुलाने सर्व प्रकार चुलत आजोबांना शेतात नेऊन सांगितला. दोन दिवसांच्या उपचारानंतरही गंभीर जखमी असलेल्या चंद्रकांत मारापल्ले यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तपास केला असता रक्ताने माखलेली फरशी आणि मृताचे कपडे त्यांच्या हाती लागले आहेत. त्यानुसार चाकूर पोलीस ठाण्यात 302 अन्वेय गुन्हा दाखल झाला असून धनंजय याला अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले चंद्रकांत मारापल्ले हे लातुररोडचे उपसरपंच होते. शिवाय 2012मध्ये चाकूर पंचायत समिती सभापती राहिलेले होते.