लातूर- यंदाही लातूरकरांना रेल्वेने पाणीपुरवठा करवा लागणार, अशी स्थिती भर पावसाळ्यातच ओढावली होती. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन तयारीलाही लागले होते. मात्र, परतीच्या पावसाने कृपादृष्टी दाखवली आणि पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर शेतीच्या पाण्याचा प्रश्नही निकाली लागला. ऑक्टोबर अखेरपर्यंत सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस, तर गेल्या तीन आठवड्यात ९० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे, पावसाळ्यातच लातूरकरांना दुष्काळाशी सामना करावा लागला होता तर, परतीच्या पावसाने ओल्या दुष्काळाशी दोन हात करावे लागले.
हंगामाच्या सुरवातीला वरुणराजाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे खरिपाच्या उत्पादनात घट होणे निश्चित होते. त्यावेळी जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा कायम ठेवण्याची नामुष्की ओढवली होती. ऑक्टोबरच्या सुरवातीला ३७ टँकर लातूरकरांची तहान भागविण्यासाठी धावत होते. हीच परस्थिती कायम राहिल्यास २०१६ प्रमाणे पुन्हा रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणार होता. ८ दिवसाचा पाणीपुरवठा १० दिवसांवर आणि नंतर १५ दिवसांवर गेला होता. अशी भयावह स्थिती असताना ऑक्टोबर अखेरीस जिल्ह्यात परतीच्या पावसाची कृपादृष्टी झाली आणि सर्व चित्रच बदलले.
अवेळी झालेल्या पावसाने खरीपातील पिकांचे नुकसान झाले. मात्र, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला. कोरडेठाक असलेले प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहेत. तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात गेल्या २१ दिवसांमध्ये तब्बल ४१ दलघमी पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. सर्वाधिक पाऊस अहमदपूर तालुक्यात, म्हणजे ९७५ मिमी झाला आहे. वार्षिक सरासरी ८०० मिमी असताना जिल्ह्यात ७५० मिमी पाऊस झाला आहे.
शिवाय, सर्व टँकर बंद करून अधिग्रहणाची संख्याही शून्यावर आली आहे. मांजरा नदीही या परतीच्या पावसाने वाहू लागली आहे. जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्प तुडुंब भरले असून त्यामुळे वर्षभराचा पाणीप्रश्न मिटला आहे. असे असताना जलसंवर्धन होणेही तेवढेच आवश्यक आहे. ऐन काढणीच्या प्रसंगीच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा दुष्काळाच्या छायेत असलेल्या जिल्ह्यात या हंगामात कोरडा आणि ओला दुष्काळ पाहायला मिळाला आहे.
हेही वाचा- 'कर्जमाफीस पात्र म्हणून सत्कार झाला, पण कर्जमाफी झालीच नाही'