लातूर - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. अद्यापही धोका टळलेला नाही. परिणामी वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. परंतु, ऑक्सिजनचा कुठेही साठेबाजार होऊ देणार नसल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, एकीकडे आरोग्य मंत्री राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचे सांगत असताना, आज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मात्र ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची जाहीर कबुली दिली आहे.
लातूर जिल्ह्यात कोरोनाच्या तीन हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे जवळपास 1600 ते 2000 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असताना केवळ जिल्ह्यात केवळ 1000 सिलेंडरचा पुरवठा होत आहे. परिणामी ऑक्सिजन वेळेत मिळत नसल्याने रुग्ण रेफर करण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात दोन एजन्सीकडून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली ऑक्सिजन लिक्विड हे पुणे आणि नागपूरहून दाखल होते.
सध्या राज्यभरातून मागणी असल्याने ऑक्सिजनची टंचाई भासत असल्याचे कबुली पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली. यापूर्वी 80 टक्के ऑक्सिजन हा कमर्शियलसाठी वापरला जात होता. मात्र, हे सूत्र आता बदलले आहे. 80 टक्के ऑक्सिजन हा आरोग्यासाठी वापरला जात आहे, तर केवळ 20 टक्के उद्योगासाठी वापरण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत असला तरी लवकरच उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन यावेळी देशमुख यांनी दिले दिले.