लातूर - गेल्या 10 महिन्यांपासून सर्वजण हे कोरोनाच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु, नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी उदगीर येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशासकीय अधिकारी तसेच उदगीरकर मोठ्या संख्येने सहभागी होते.
कोरोनाच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य झाले नाही. शिवाय घरातच असल्याने अनेक आजारांना बळीही पडावे लागले होते. हाच विचार घेऊन उदगीर येथील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने 24 जानेवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सकाळच्या प्रहरी मुख्य रस्त्यावरून नागरिक धावत होते. यामध्ये तरुण, ज्येष्ठ नागरीकही उपस्थित होते. विशिष्ट अंतर धावल्यानंतर एकत्र येत गाण्यावर नृत्य आणि भरगच्च कार्यक्रम पार पडले. कोरोना काळातही शहरातील डॉक्टरांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे तर आता संकट दूर होत असतानाही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेत महिला, तरुणी, तरुण तसेच प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शिवाजी महाविद्यालय ते मत्स्य महाविद्यालय या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत एकूण 352 स्पर्धकांनी दहा कि.मी तर पाच कि.मी. व साडेतीन कि.मी अशा तीन स्तरांमध्ये स्त्री-पुरुष या पद्धतीने स्वतंत्र आणि तसेच पदवी विद्यार्थी या गटात सहभाग घेतला होता.