लातूर - गेल्या आठ दिवसांपासून लातूर जिल्हा हा ग्रीनझोनमध्ये होता. मात्र, उदगीरच्या 70 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने लातूर जिल्हा पुन्हा ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. उदगीरमध्ये एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
संबंधित महिला ही गुजरातच्या एका महिलेच्या संपर्कात आली होती. त्यामुळे तिला लागण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जिल्हा बंदी असताना असे प्रकार घडतातच कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यापूर्वी हरियाणा येथून आंध्रप्रदेश येथे जाणाऱ्या ८ नागरिकांना निलंगा येथे क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते. त्यांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. १४ दिवसांच्या उपचारानंतर ते बरे झाले आहेत. त्यामुळे लातूरचा ग्रीन झोनमध्ये समावेश झाला होता. मात्र, ८ दिवसानंतर पुन्हा एक महिला कोरोनाबाधित आढळून आल्याने आता लातूर पुन्हा ऑरेंज झोनमध्ये गेले आहे.