लातूर- पाणीटंचाईच्या झळा आता जीवावर बेतू लागल्या आहेत. टँकरने भाजीपाल्याची जोपासना करताना टँकरसह ट्रॅक्टर कोरड्या विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना लातूर तालुक्यातील ममदापूर येथे सोमवारी रात्री घडली.
भर पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा लातूरकरांना सहन कराव्या लागत आहेत. याच पाणीटंचाईचा तुकाराम बैल हे बळी ठरले आहेत. शहरापासून जवळच असलेल्या ममदापूर येथील शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी शेतामध्ये कोथिंबीरची लागवड केली होती. पाणी नसल्याने शहरातील सांडपाणी भाड्याने लावलेल्या टँकरच्या साहाय्याने घेऊन ते पिकाची जोपासना करीत होते. सोमवारी रात्री तुकाराम बैल यांनी पाण्याचा टँकर भरला आणि कोरड्या विहिरीत पाणी सोडण्यासाठी ते शेतावर गेले. मात्र, ट्रॅक्टर मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटला आणि पाण्याच्या टँकरसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळले यामध्ये चालक असलेल्या तुकाराम बैल यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 5 मुली असा परिवार आहे.
हेही वाचा- दुष्काळी लातुरात 'उजनी'च्या पाण्यावरून राजकारण तापले, पुन्हा होणार रेल्वेने पाणीपुरवठा?