लातूर - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, असे असतानाही नागरिकांकडून नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याने आता मास्क न घातल्यास थेट दोनशे रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय महानगपालिकेने घेतला आहे. मंगळवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
लातूरकरांनी रस्त्यावर येऊ नये, म्हणून पोलीस अधिकारी 24 तास कर्तव्य बजावत आहेत. आतापर्यंत प्रभात फेरीला जाणाऱ्या तब्बल 400 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय दंडात्मक कारवाईही केली जात आहे. असे असताना दुसरीकडे सुरक्षेसाठी आवश्यक असलेले मास्क न परिधान करता काही नागरिकांचे रस्त्यावर येणे सुरूच आहे. त्यामुळे मनपाने आता निर्णय घेतला आहे.
मास्क न घातल्यास दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. मंगळवारी याची सुरुवात झाली. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील भारही कमी होणार आहे, तर नागरिकांची वर्दळही कमी होणार आहे. हा उपक्रम चांगला असला तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होणार का हे पाहावे लागणार आहे.