लातूर - जिल्ह्यात दिवसाकाठी रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत लातूर शहरात रुग्णांचा आकडा अधिक वेगाने वाढत असून, शनिवारी 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पैकी 24 रुग्ण एकट्या लातूर शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे लातूरकरांची चिंता वाढली आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 650 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी 366 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. पैकी 24 लातूर शहर आणि तालुक्यातील असून 2 चाकूर तर 2 रुग्ण हे उदगीरमध्ये आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे. त्यानुसार सोमवारी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर अंकुश घालण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांना बैठक घेण्याचे अवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. त्यामुळे लॉकडाऊनची मागणी आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या होणाऱ्या बैठकीत काही वेगळा निर्णय होणार का हे पहावे लागणार आहे.