लातूर - शहराच्या मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात 7 नव्या रुग्णांची भर पडली असून यामध्ये लातूर शहरातील 6 रुग्ण आहेत. त्यामुळे मनपा हद्दीत आता कोरोनाचा शिरकाव झाला असून मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. शहरात 4 ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली होती. परिणामी ग्रीनझोनच्या उंबरठ्यावर असलेल्या लातुरात आता रुग्णांची संख्या ही 69 एवढी झाली आहे. यामध्ये अधिकतर रुग्ण प्रवास करून आलेले आहेत. उदगीर पाठोपाठ लातूर शहरात रुग्ण अधिक आहेत. शनिवारी 86 नमुने तपासणीसाठी दाखल झाले होते. त्यापैकी 7 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत.
यामध्ये देसाई कॉलनीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तिघांचा समावेश आहे. तर मोती नगरमधील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. एक रुग्ण हा जिजामाता नगर येथील असल्याचे समोर आले आहे.
उदगीर उपजिल्हा रुग्णालयातुन 33 व्यक्तींचे अहवाल दाखल झाले होते. त्यापैकी शहरातील एकाला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 69 तर उपचारानंतर बरे होऊन 65 रुग्ण हे घरी गेले आहेत. आतापर्यंत तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकंदरीत जिल्हा प्रशासनाकडून एक ना अनेक उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी रुग्णांची संख्या ही वाढतच आहे.