लातूर - जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगामच महत्त्वाचा असतो. मात्र, यंदा पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना एक ना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात 84 हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीचा फटका तुरीला बसला नसला, तरी आता ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक करपून जात आहे. काही ठिकाणी, तर तुरीचा अक्षरशः खराटा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
झालेला खर्चही काढणे मुश्किल -
बेभरवशाची शेती काय असते, याची प्रचिती लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत आहे. खरिपाच्या सुरवातीला पोषक वातावरण असल्याने सरासरीपेक्षा अधिकचा पेरा झाला होता. जिल्ह्यात एकूण खरीपाचे क्षेत्र हे 6 लाख 22 हजार हेक्टर एवढे आहे. यापैकी 4 लाख 59 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन अंतिम टप्प्यात असताना प्रचंड नुकसान झाले होते. अखेर बाजारात चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काही प्रमाणात का होईना पैसे पडले होते. मात्र, आता तुरीचे पीकही संकटात सापडले आहे. तूर काढणीला 15 दिवसांचा अवधी असताना जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तूरीचे पीक करपून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता काय करावे, याबाबतचे मार्गदर्शनदेखील होत नाही. त्यामुळे खरिपातील दोन मुख्य पिकांना असा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेषतः लातूर तालुक्यातील हरंगूळ, मुरुड, गातेगाव परिसरातील, तर उदगीर तालुक्यातील वाढवना, हाळी, हेर या परिसरात अधिकचे नुकसान होत आहे. सोयाबीनच्या नुकसानिपोटीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. अशातच तुरीचे नुकसान होऊ लागल्याने झालेला खर्चही काढणे मुश्किल झाले आहे. शिवाय खरिपातील पिके काढण्यास विलंब झाला असल्याने रब्बीतील पेरण्याही लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरत आहे.
अंतिम टप्पातील नुकसानीमुळे उत्पादनात घट -
तुरीची काढणी 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे. आतापर्यंत पेरणी, मशागत आणि खत, बी- बियाणे याकरिता हजारोचा खर्च करूनही शेवटी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. यावर औषध फवारणी करावी, तर काही क्षेत्रावरील तूर ही चांगली आहे, तर काही क्षेत्रावरील तूर ही करपून गेलली आहे. त्यामुळे आता उत्पादनात तर घट होणार हे नक्की झाले आहे.
हेही वाचा - महिलेला समाजातून बहिष्कृत करणाऱ्या जातपंचायतीच्या सात पंचांना अटक