लातूर- जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना लातुरकरांनी विविध भूमिकेत पाहिले आहे. आताही अशाच एका नव्या भूमिकेत ते दिसले आहेत. शुक्रवारी ते थकबाकी वसुल करताणाच्या भूमिकेत दिसले. जी. श्रीकांत यांना देवीच्या दर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्या ठिकाणी वैष्णव देवीचे दर्शन घेऊन त्यांनी ३० हजारांचा थकीत मालमत्ता करही भरुन घेतला.
मालमत्ता कर वसुली थकीत असल्याने मनपाचा कारभार डबघाईला आला आहे. महावितरणचे वीजबिल अदा करण्यासही प्रशासनाकडे पैसे नसल्याने मध्यंतरी 15 दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे आता कर वसुलीवर मनपा प्रशासनाने भर दिला आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडेच मनपा आयुक्ताचा अतिरिक्त पदभार आहे. या महिन्यात 60 कोटींची वसुली करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यानुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नगरसेवक महापौर हे कामाला लागले आहेत.
त्याचाच एक प्रत्यय शुक्रवारी समोर आला. हरिभाऊ नगरमधील एका व्यक्तीच्या घरी जी. श्रीकांत यांनी वैष्णवी देवीचे दर्शन घेऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर त्याच व्यक्तीकडील 30 हजारांची पालिकेची थकबाकीही त्यांनी भरुन घेतली. त्यामुळे आता मनपाच्या मोहिमेला गती मिळेल हे नक्की. तर दुसरीकडे महापौर विक्रांत गोजमगुंडे हे देखील कर भरण्याचे आवाहन करीत आहेत. त्यामुळे मनपाच्या या मोहिमेला लातूरकर कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.