लातूर - शाळांमधील सर्व चतुर्थश्रेणी पदे कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये शाळेतील शिपाई, नाईक, पहारेकरी तसेच प्रयोगशाळेतील परिचर यांचा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयाचा लातूर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात संघटनेच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
11 डिसेंबर रोजी राज्य शासनाने हा आदेश काढला आहे, या आदेशानुसार चतुर्थश्रेणीमधील कर्मचारी यांना आता वेतन किंवा मानधन नाही तर भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शासनाच्या या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांचे अस्तित्व संपणार आहे. कायम मानधन अथवा वेतनश्रेणीवर नेमणूक न करता, शासनाने असा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.
...अन्यथा अध्यादेशाची होळी
शासनाचा हा निर्णय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. यामुळे शिपाई, पहारेकरी, प्रयोगशाळेतील परिचर यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा, सरकारच्या या अध्यादेशाची होळी करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.