लातूर - ‘मोक्का’तील फरार आरोपीला निलंगा तालुक्यातील त्याच्या मूळगावी हंगरगा येथे पोलिसांनी मोठ्या शिताफिने पकडून अटक केली. औराद, लातूर ते पुणे कनेक्शन असलेला मोईज रब्बानी शेख हा अनेक दिवसांपासून फरार होता.
वाकड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत त्याच्यावर कार्यवाही केली होती. गेल्या कित्येक महिन्यांपासून फरार असलेल्या या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी त्याच्या मूळगावी सापळा रचून अटक केली. हा आरोपी पुणे येथे काळेवाडी परिसरात राहत होता. तो अनेक गुन्ह्यांमध्ये सक्रिय होता. काळेवाडी येथून तो फरार झाल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. मोईज हा त्याच्या निलंगा तालुक्यात मूळगावी हंगरगा येथे गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर वरिष्ट अधिकारी डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक हरीश माने व स.पो.नि.सिद्धनाथ बाबर यांनी एक पथक तयार केले. हे पथक लातूर येथे येवून औराद शहा.पोलीस स्टेशनचे स.निरीक्षक सुधीर सुर्यवंशी यांना संपर्क साधून त्यांच्या मदतीने व मार्गदर्शनात बापू काळे यांनी त्या आरोपीस मोठ्या शिताफीने पकडले. त्यास वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.