लातूर - आमदार संभाजी पाटील-निलंगेकर आणि पालकमंत्री अमित देशमुख यांच्यातील शाब्दिक शीतयुद्ध कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे. आता अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री अमित देशमुख आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची मदत केली तर जाहीर व्यासपीठावर त्यांचा सत्कार करू असे आव्हानच आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिले आहे. पीक विमा कंपनीची दलाली करणाऱ्या या सरकारकडून शेतकऱ्यांना काय मदत मिळणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान पावसामुळे झाले आहे. जिल्ह्याचे नेतृत्व असलेल्या पालकमंत्री अमित देशमुख यांना शेतकऱ्यांचे दुःख पाहण्यास वेळ नाही. जिल्ह्याचा कारभार जिल्हाधिकारी हेच पाहत असल्याने त्यांनाच आम्ही सरकार संबोधित असल्याचे यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले. खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान पावसामुळे झाले आहे. हे नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, पंचनामे न करता थेट मदत देणे आवश्यक आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाऊले उचलली नाहीत तर आगामी काळात होणाऱ्या बैठकांवर भाजपच्या वतीने बहिष्कार घातला जाईल. केवळ आश्वानसे देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मिटत नाहीत तर त्यासाठी बांधावर जाऊन पाहणे आवश्यक असल्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.
हेही वाचा - पती कॅन्सरने पीडित असताना लातूरच्या रणरागिणीची 6 महिने सुट्टी न घेता रुग्णांची अविरत सेवा
पीक विमा कंपन्यांच्या दलालीचे काम हे सरकार करीत आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि एकरी 50 हजारांची मदत पालकमंत्री यांनी मिळवून दिली तर त्यांचा जाहीर सत्कार करू, असे यावेळी आमदारांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आ. संभाजी पाटील-निलंगेकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सर्वसाधारण सभेत अमित देशमुख यांनी त्यांच्या कामाबद्दल सत्काराचा प्रस्ताव ठेवला होता. पण, वर्षभरानंतर पाटलांनीही सत्कार करण्याचे सांगितले, पण त्यांना एक प्रकारचे आव्हान देऊन. त्यामुळे जिल्ह्यातील या दोन प्रमुख नेत्यांमधील आरोपांची चर्चा आता रंगू लागली आहे.
हेही वाचा - ईटीव्ही इम्पॅक्ट : लातूरच्या शिवणी बॅरेजच्या चौकशीचे पालकमंत्र्यांनी दिले आदेश