लातूर - बारामती मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात जेव्हा राज्याचे गृहखाते असताना महिला व वंचितावरील अन्यायाच्या घटना वाढतात, असे वक्तव्य आमदार पडळकर यांनी केले आहे. ते सास्तूर येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
चार दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर येथील 9 वर्षीय मुलीवर तिघांनी अत्याचार केला होता. तिघे आरोपी हे अल्पवयीनच आहेत. सध्या लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात मुलीवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारी रुग्णालयात येऊन मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, की घटना होताच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दौरा सुरू होता. अद्यापही मुलगी गंभीर अवस्थेत आहे.
पुढे पडळकर म्हणाले, की राज्यात गृहखाते हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असते, तेव्हा महिलांवर, गोरगरीब जनतेवर आणि उपेक्षितांवर अन्याय होतो. यामध्येही राजकारण केले जात आहे. पोलीस याचा तपास लावतील, पण अशा घटना घडत असतील तर सरकारचे अपयश आहे. कारवाई होत नसल्याच्या समजुतीमधून अशा घटना वाढत असल्याचे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
पडळकर यांनी कुटुंबियांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाशीही चर्चा केली. मात्र, अजूनही दोन दिवस मुलीच्या प्रकृतीबाबत निश्चित असे काही सांगता येत नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.