लातूर - भाजपकडून विद्यमान खासदारांना डावलून कशाप्रकारे उमेदवारी दिली गेली याची सर्व मतदारसंघात चर्चा सुरू आहे. उमेदवारापेक्षा त्याला कशाप्रकारे उमेदवारी दिली गेली हे महत्वाचे आहे. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, अशीच होणार असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी सांगिलते. बुधवारी लोकसभा उमेदवारांसोबत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपवर आरोप केले.
गेल्या ५ वर्षांत केवळ घोषणांचा पाऊस झाला असून जिल्ह्यात भ्रष्टचार वाढत आहे. मागच्या निवडणुकीची गोष्ट वेगळी होती परंतु ५ वर्षातील कारभरानंतर आता जनता बदल करण्याच्या पवित्र्यात आहे. केवळ घोषणा करून नाही तर त्याची अंमलबजावणी झाल्यास लोक स्वीकारतात. युती सरकारच्या काळात घोषणांचा पाऊस झाला आणि कामे न झाल्याने सर्वच स्थरातील नागरिक असंतुष्ट आहेत. नवे उद्योग, बेरोजगारांच्या हाताला काम आणि भ्रष्टचार मुक्त लातूर या विषयावर लक्ष केंद्रित करून मतदारांसमोर जाणार असल्याचेही अमित देशमुख यांनी सांगितले. सर्वच बाबतीत आघाडीचे उमेदवार हे सरस आहेत. त्यामुळे २००९ ची पुनावृत्ती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसने काहीच केले नसल्याच्या आरोपाला माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी उत्तर दिले. देशात जी क्रांती झाली आहे त्यामध्ये काँग्रेसचा कसा वाटा राहिला आहे, हे त्यांनी पटवून दिले. केवळ आरोप-प्रत्यारोपांवर निवडणूक नसते तर जनतेच्या प्रश्नाचेही निरसन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवार मच्छिंद्र कामत यांनी पक्षश्रेष्टींचे आभार मानून पक्षाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे सांगितले. यावेळी आमदार त्र्यंबक भिसे, जि. प. सदस्य धीरज देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोईन शेख यांच्यासह शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पटेल, अतुल कुलकर्णी, विजय जाधव यांची उपस्थिती होती.
तर नाराज खासदारांचे काँग्रेसमध्ये स्वागतच
सध्या नाराज पण भाजपतच असलेले विद्यमान खासदार प्रचार यंत्रणेत कुठे दिसत नाहीत. मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येऊनही केवळ अर्थार्जनासाठी त्यांना डावलण्यात येणे गंभीर आहे. त्यांचे काँग्रेसमध्ये केव्हाही स्वागत असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. बुधवारी लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रातनेश्वराला अभिषेक घालून काँग्रेसने प्रचाराला सुरवात केली आहे. उशीरा का होईना लातूर लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे.