लातूर - ईटीव्ही भारतने कोरोनाबाबत ग्रामस्थांमध्ये असलेले समज आणि गैरसमज जाणून घेण्यासाठी लातूरच्या हरंगुळ (खुर्द) येथे ग्रामस्थांसोबत चर्चा केली आहे. कोरोना विषाणू काय आहे, त्याबद्दल घ्यावयाची काळजी इथपर्यंतची माहिती या ग्रामीण भागातील जनतेलाही झाली आहे. मात्र, कोणाला कोरोनाची लागण झाली की त्यातून सुटका नाही, हा गैरसमज ग्रामस्थांमध्ये आहे. जिल्हा प्रशासनाची जनजागृती मोहीम आणि प्रत्यक्षात ग्रामस्थांच्या मनात कोरोनाबद्दल काय आहे, यासंबंधी हरंगूळ (खुर्द) येथे घेतलेला हा आढावा...
हेही वाचा... VIDEO : 'कोरोना' उद्रेक, अन् चीनमधील अनुभव.. विशेष मुलाखत - भाग ३
सुदैवाने लातूर जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही, असे असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार आशा सेविका, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, लोकप्रतिनिधीही घराघरात जाऊन जनजागृती करत आहेत. मात्र, ग्रामस्थांच्या मनात कोरोनाबद्दल नेमके काय आहे, याचा ठाव घेतला असता अनेक बाबी समोर आल्या आहेत.
काही जागृत ग्रामस्थांनी याबाबत काळजी घेतली जात असून सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करत असल्याचे सांगितले. तर काहींनी कोरोना हा न बरा होणारा आजार आहे. एकदा याची लागण झाली सुटका नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शिवाय ग्रामीण भागातील अस्वच्छता आणि प्रशासनाची उदासीनता यासारख्या बाबीही त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
हेही वाचा... भारतात कोरोनाचे १९५ रुग्ण; महाराष्ट्र आणि केरळात सर्वात जास्त फैलाव
ग्रामीण भागात कोरोनाबद्दल जितकी धास्ती आहे, त्याहून अधिक समज-गैरसमज आहेत. जिल्हाधिकारी, राज्यसरकार हे विविध उपाययोजना राबवण्याचे आवाहन करत आहेत. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणेही तेवढेच गरजेचे आहे. हरंगूळ (खुर्द) गावात दोन दिवसांत 15 ते 20 तरुण हे पुण्याहून दाखल झाले आहेत. त्यांची नोंद घेऊन तपासणी केली जाणार आहे. तसेच जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रमही राबवले जाणार असल्याचे गावाच्या सरपंचांनी सांगितले.