लातूर : काही दिवसांपुर्वीच कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. आता किल्लारीसह (Earthquake Killari) परिसरात शनिवारी मध्यरात्री दोन वाजून, सात मिनिटे व एकवीस सेकंदाला भूकंपाचा भूकंपाचा सौम्य धक्का नागरिकांना (Mild earthquake hits Killari) बसला. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल असून, भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात असल्याचे व या धक्क्याची खोली जमिनीत पाच कि.मी. अंतरावर असल्याचे लातूरच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले आहे.
सदरील भूकंप किल्लारीसह यळवट, सिरसल, पारधेवाडी, कार्ला, कुमठा, नदीहत्तरगा, सांगवी, जेवरी, तळणी, बाणेगावसह उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांत जाणवला. गेल्या सहा महिन्यांपासून किल्लारीत भूकंपाचा धक्का जाणवला नाही.
1993 चा महाप्रलयंकारी भूकंप हा 30 सप्टेंबर रोजी झाला होता. तेव्हापासून सप्टेंबर महिन्यात अनेकवेळा भूकंपाचे धक्के बसले. यावर्षी सप्टेंबर महिना अपवाद फक्त किल्लारीकरांना गेला. परंतु जवळच असलेल्या निलंगा तालूक्यातील हासोरी गाव व परिसरात भुकंपाचे अनेक धक्के बसले. शनिवारी मध्यरात्री भूकंपाचा धक्का बसताच, अनेक नागरिक घराबाहेर पडले. थंडीच्या कडाक्यातही येथील नागरिकांनी रात्र जागून काढली. शेकोटीच्या साक्षीने 1993 च्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. या भुकंपाचे वर्गीकरण 'सुक्ष्म' या कॅटेगिरीमध्ये येते. या भुकंपामुळे परिसरात कसलेही नुकसान झाले नाही. परिसरातील नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.