लातूर - लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा स्थलांतरित मजुरांना बसला आहे. हाताला काम नाही आणि खिशात पैसा नाही, त्यामुळे जगावे कसे? असा प्रश्न निर्माण झाल्याने मजूर गाव जवळ करत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहनाची सोय नसल्याने अनेक मजूर पायपीट करत ठाण्यातून बिदरकडे निघाले आहेत. या मजुरांनी सलग 5 दिवस पायपीट केल्यानंतर हे मजूर लातुरात पोहोचले होते.
बिदर जिल्ह्यातील बोनती येथील मजूर उदरनिर्वाहासाठी ठाण्याला गेले होते. मात्र, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी पैसा नाहीत. शिवाय रूम मालकांनीही भाड्याचा तगादा लावल्याने अनेक मजुरांनी पायपीट करत, मिळेल त्या वाहनाने गावाकडची वाट धरली. तर मुजरांनी जगण्यासाठी शहरात आलो होतो. मात्र, आता जिवंत राहण्यासाठी गावी जात आहोत, असे सांगितले.
मजुरांनी गावी जाण्यासाठी आरोग्य तपासणी करून जिल्हा प्रशासनाची परवानगीही घेतली. मात्र, प्रवासाची कोणतीही सोय नसल्याने त्यांनी पायी प्रवास करण्यास सुरुवात केली होती. पाचव्या दिवशी ते 11 प्रवाशी लातुरात दाखल झाले होते. कुणी दिले तर खायचे अन्यथा उपाशी पोटी प्रवास करायचा आणि रिकामी जागा दिसेल तिथे रात्र काढायची. 2 दिवसांनी गावात जाऊ, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. आता कायम गावातच राहायचे पुन्हा कामासाठी शहराकडे फिरकायचे नाही, असेही त्यांनी सांगितले.