लातूर - निलंगा तालुक्यातील उमरगा (हा) येथील नागनाथ हे 11 वर्षांपासून देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत होते. रविवारी पूर्व सिक्कीम येथे गस्त घालत असताना त्यांची गाडी खोल दरीत कोसळली आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून उमरगा येथे शोककळा पसरली होती. बुधवारी दुपारी त्यांचे पार्थिव गावात दाखल झाले. शेतामध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंजिनिअर रेजिमेंट 106 इंडियन आर्मीमध्ये नागनाथ अभंग लोभे हे भरती झाले होते. तीन वर्षांपासून पूर्व सिक्कीम सीमेवर ते कर्तव्य बजावत होते. रविवारी 20 डिसेंबरला पहाटे 4 वाजता गस्त घालत असताना दरड कोसळल्याने त्यांची गाडी खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत नागनाथ लोभे यांच्यासह इतर चार जवानही शहीद झाले होते. रविवारी रात्री या घटनेची माहिती ग्रामस्थांना आणि नातेवाईकांना समजली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून गावात शोककळा पसरली होती. बुधवारी दुपारी नागनाथ लोभे यांचे पार्थिव गावात आणण्यात आले होते. येथील शाळेच्या परीसरात अंत्यदर्शन घेतल्यानंतर शेतामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, त्यांचे पार्थिव शेताकडे नेत असताना जागोजागी रांगोळ्या आणि शहीद जवान अमर रहे... चे फलक लावण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख, आमदार अभिमन्यू पवार तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. शहीद नागनाथ लोभे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील असा परिवार आहे. आर्मड कोर अहमदनगर येथील सैन्य दलाकडून आणि पोलीस पथक लातूर यांच्याकडून हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
दोन दिवसांपासून चुली पेटल्या नाहीत -
गावच्या पुत्राला सीमेवर कर्तव्य बजावत वीरमरण मरण आल्याची वार्ता गावात समजताच शोककळा पसरली होती. ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसांपासून चूल देखील पेटवली नव्हती. आज रांगोळ्या आणि ठिकठिकाणी फलक लावून नागनाथ लोभे यांच्या पार्थिवाचे स्वागत केले तर शासकीय इतमामात त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.