लातूर- डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जिवंत समाधी घेण्याचा कोणताही मानस नाही. हे सर्व भक्तीस्थळ विश्वस्त मंडळाकडून घडवून आणले जात आहे, असा आरोप शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केला आहे. महाराजांना जिवंत समाधी घेण्यास भाग पाडणे हा गुन्हा असून विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी धोंडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. शिवाचार्य महाराजांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
गुरुवारपासून लातूर जिल्ह्यात डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे आज हजारोंच्या संख्येने भक्त अहमदपूर येथील भक्तीस्थळावर दाखल झाले होते. मात्र, हा सर्व प्रकार ट्रस्टचे माधवराव बर्गे, सुभाषाप्पा सराफ, बब्रुवान हैबतपुर, व्यंकट मुंढे हे घडवून आणत आहेत. भक्तीस्थळावरील संपत्तीवर ट्रस्ट मंडळाच्या काही सदस्यांचा डोळा असल्याचा आरोपही धोंडे यांनी केला.
हेही वाचा-डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधी घेणार असल्याची अफवा; हजारो भक्त अहमदपूरमध्ये दाखल
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे जिवंत समाधी घेणार नाहीत हे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. शिवाय राजशेखर स्वामी हे उत्तराधिकारी असल्याचेही त्यांनी शुक्रवारी सांगितले आहे. जिवंत समाधी घेतल्याचे मार्केटिंग करुन भक्तीस्थळाची 20 एकर जमीन ताब्यात घ्यायची हा डाव असल्याचा आरोप धोंडे यांनी केला आहे.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज नियमित तपासणीसाठी रुग्णालयात
आज सांयकाळी भक्तीस्थळ येथील भक्तांची गर्दी कमी करण्यात आली होती. नियमित तपासणी तसेच डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना विश्रांती मिळावी याकरीता त्यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. लाखो भक्तांची श्रद्धा असलेल्या महाराजांच्या जिवंत समाधीची अफवेमुळे नाराजी व्यक्त होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शुक्रवारी हजारो भक्त अफवेमुळे अहमदपूर येथे दाखल झाले होते.
हेही वाचा-काम नसल्याच्या नैराश्येतून २५ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या