लातूर- सध्या कोरोनाचे संकट घोंगावत असले तरी दुसरीकडे वरुण राजाने कृपादृष्टी दाखवलेली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणीपातळी वाढत आहे. पाणीसाठ्यात अशीच वाढ राहिली तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सात दिवसाला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दरवर्षी लातूर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही उन्हाळ्यात 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याची नामुष्की मनपावर ओढवली होती. लातूर शहरासह येथील औद्योगिक क्षेत्रात मांजरा धारणवरुनच पाणीपुरवठा केला जातो. तब्बल 224 दलघमी क्षमता असलेले धरण गेल्या दोन वर्षांपासून मृत साठ्यात आहे. मे अखेरीस धरणाची पाणीपातळी ही 16 दलघमीवर आली होती. मात्र, यंदा पावसाने वेळीच हजेरी लावल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे.
दीड महिन्यात 16 दलघमी पाणीसाठा वाढला आहे. सद्यस्थितीला धरणात 32 दलघमी पाणीसाठा आहे. शिवाय दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आता लातूरकरांवरील पाणी संकट काही प्रमाणात का होईना कमी होईल. यासंदर्भात सोमवारी महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली आहे. पाण्याचा काटकसरीने वापर आणि धरणातील वाढती पातळी पाहता ऑगस्ट महिन्यापासून सात दिवसाला पाणीपुरवठा केला जाईल, असे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आहे. यासंबंधी आढावा तयार होताच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.