औसा (लातूर) - सध्यस्थितीत राज्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत लागली आहे. मात्र, औसा तालुक्यातील मौजे माळुंब्रा या गावात कोरोनाचा उद्रेक झाल्याचा चिंताजनक प्रकार समोर आला आहे. या गावात मंगळवारी तब्बल 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासनाने हे गाव सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच औसा तालूक्यातील बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक विशेष तपासणी करण्यासाठी माळुब्रा गावात दाखल झाले आहे. औशाचे तहसीलदार शोभा पुजारी यांनी याबाबतची माहिती 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
लातूरच्या औसा तालुक्यातील मौजे माळुंब्रा गावाची लोकसंख्या अंदाजे सहाशेच्या आसपास आहे. 1993 च्या किल्लारी भूकंपानंतर हे गाव दोन भागात विभागले आहे. माळुंब्रा गावच्या पश्चिम भागातील एक व्यक्ती खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी औसा येथे गेला होता. त्याची तपासणी केली असता, तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. या अनुषंगाने गावातील अन्य ग्रामस्थांची तपासणी केली असता, तब्बल 18 ग्रामस्थ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमजद पठाण यांचे पथक मंगळवारी (दि.27) माळुंब्रात दाखल झाले. या पथकाने गावातील अन्य 37 ग्रामस्थांची तपासणी केली असता, अन्य चार व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानुसार 22 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून यातील 13 रुग्णांना लातूरच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचारार्थ पाठवण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमजद पठाण यांनी सांगितले आहे.
औशाचे तहसीलदार शोभा पुजारी व गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी माळुंब्रा गावाला तात्काळ भेट दिली. खबरदारीचा उपाय म्हणून गाव सील करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. माळुंब्रा गाव दोन वस्तीत वसलेले असून गावाचा पश्चिम भाग कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.