लातूर - काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे लातूर जिल्हा हे सर्वश्रुत आहे. परंतु गेल्या 4 वर्षात राजकीय समीकरणे बदलली असून जिल्ह्यासह लातूर शहरावरही याचा परिणाम झाला आहे. यंदा मात्र, वंचितकडून मुस्लिम उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असल्याने काँग्रेसची पकड ढिली होणार असल्याचे चित्र आहे. नव्याने उभा राहीलेल्या वंचित आघाडीचे आव्हान काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्यासमोर राहणार आहे.
लातूर शहर मतदार संघ हा मुस्लिम बहुल मतदार संघ म्हणून ओळखला जातो. याच मतदारामुळे काँग्रेसने शहरावर पकड मजबूत केली होती. यंदा मात्र, वंचितकडून मुस्लिम उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असल्याने काँग्रेसची पकड ढिली होणार असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला लातूर शहरातून २२ हजार मते मिळाली होती. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही वंचितचा फॅक्टर महत्वाचा ठरणार असून या उमेदवारांच्या मतावरच आमदार कुणाचा हे ठरणार आहे. गत निवडणुकीत अमित देशमुख यांचा ४९ हजार मतांनी विजय झाला असला तरी बदललेली परिस्थिती आणि नव्याने दाखल झालेल्या वंचितच्या आघाडीचे आव्हान आमदार अमित देशमुख यांच्यासमोर राहणार आहे.
जिल्ह्यात ६ विधानसभा मतदार संघ असून तीन काँग्रेसकडे तर तीन भाजपाकडे अशी समसमान स्थिती आहे. मात्र, २०१४ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झाली असून लातूर शहरातील महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती यावर भाजपाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. शहरातही भाजप कार्यकर्त्यांची दुसरी फळी निर्माण झाली असून लोकसभा निवडणुकीत शहरातूनही भाजपला आघाडी मिळाली होती. दुसरीकडे काँग्रेसकडे अमित देशमुख वगळता काँग्रेसची ओळख निर्माण होईल असा एकही चेहरा निर्माण झाला नाही. राज्याप्रमाणे या बालेकिल्ल्यातही काँग्रेसला मरगळ आली असून भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचे मनोबल वाढत आहे.
आतापर्यंत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत तर अमित देशमुख हे प्रत्यक्ष कामालाही लागले आहेत. राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक असलेले राजा मणियार यांनी वंचितकडून उमेदवारी मागितली असल्याने याचा अप्रत्यक्ष फटका काँग्रेसलाच बसणार आहे. असे असले तरी या मतदार संघावर आतापर्यंत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. शिवाय देशमुख कुटुंबाला मानणारा वर्ग आजही शहरात आहेत शिवाय ग्रामीणच्या काही खेड्यांचाही समावेश या मतदार संघात असून ही देशमुखांसाठी जमेची बाजू आहे.
भाजपने उमेदवारी बद्दल आपले पत्ते उघडे केले नसले तरी अमित देशमुख यांना आव्हान देणाऱ्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. शिवाय पालकमंत्री संभाजी पाटील यांनाही आपल्या नेतृत्वाची झलक वरिष्ठांना दाखवण्यासाठी त्यांनी शहर मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे लातूर शहराबरोबर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या जागांसाठी अमित देशमुख यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे नक्की.
शहरात भाजप झपाट्याने वाढत आहे तर वंचितचा एक गट निर्माण झाला असल्याचे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. या सर्व अडचणीत परंपरागत शहर मतदार संघ कायम ठेवण्यासाठी अमित देशमुख काय रणनीती आखतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.