लातूर - एक हजार लोकवस्ती असलेल्या लिंबाळवाडी गावात 161 ग्रामस्थांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात लॉकडाऊन बाबत संभ्रम अवस्था असली तरी चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसात 1 हजार लोकवस्ती असलेल्या गावात संचारबंदी करण्यात आली. गावात कुणाला प्रवेश नाही तसेच गावातून बाहेरगावी जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तीन दिवसात तब्बल 161 कोरोना रुग्ण या गावात आढळून आले आहेत आणि याला हरिनाम सप्ताहाचे निमित्त ठरले आहे. या दरम्यान गुरुवारी 43 तर शुक्रवारी 55 कोरोना रुग्ण आढळून आले होते तर शनिवारी 63 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी आता गावात ठाण मांडून आहेत. वाढत्या रुग्णाची साखळी तोडण्यासाठी गाव सील करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 10 एप्रिल) तब्बल 541 ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 63 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सप्ताहातून सुरू झालेला प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबरहाटीचे वातावरण आहे.आरोग्य पथक गावात दाखल झाले आहे.
वैद्यकीय पथकाने 225 जणांची तपासणी केली असता त्यात 63 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता ही रुग्णासंख्या 161 वर पोहोचली आहे. गावातील 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 22 व्यक्तीला चाकूर येथील कोरोना केअर सेंटर येथे दाखल केले आहे तर उर्वरित बाधितांना होम आयसोलेशन केले आहे.
दरम्यान, तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी गावास भेट देऊन 10 दिवस गाव सील केले आहे. गावात ये-जा करण्यास बंदी घातली आहे.
हेही वाचा - पेशंटकडे बघायचे की इंजेक्शनसाठी भटकंती करायची?