लातूर- दरवर्षी वाढणारी महागाई, दुष्काळ यामुळे गणेश मूर्तींची विक्री कमी-जास्त होते. त्यामुळे नफा कमी-अधिक प्रमाणात होत असला तरी मूर्तीकार यामधून सावरतात. मात्र, यंदाचे संकट वेगळेच आहे. गणेशोत्सवात लॉकडाऊन कायम राहिला तर मूर्तीचीही विक्री होईल का नाही, याबाबत मूर्तीकार संभ्रमात आहेत. जानेवारी महिन्यापासून गणेश मुर्ती बनविण्याचे काम हाती घेतले जाते. आता हे काम निम्यांवर सोडताही येत नसल्याने मूर्तिकार गणेश मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवत आहेत. पण या बदल्यात हातामध्ये काय पडेल की नाही, याबाबत ते चिंतेत आहेत. कोरोनाचा परिणाम यंदाच्या सर्वच सार्वजनिक कार्यक्रमावर झाला आहे. त्यामुळे विघ्नहर्ताने कोरोनाचे संकट दूर करण्याची आशा मूर्तीकार व्यक्त करीत आहेत.
दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळाकडून 10 ते 12 फुटापर्यंत मूर्तीचे बुकिंग केले जाते. यंदा मात्र, 4 फुटपर्यंतच मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. विशेषतः एकाही मंडळाने आद्यपर्यंत बुकिंग केलेले नाही. त्यानुळे गणेशोत्सवाच्या काळात काय परिस्थिती राहील, त्यावरच मूर्तिकारांचे भवितव्य अवलंबून आहे. लातूर शहरातील गणेश सोनवलकर यांनी आतापर्यंत मंडळासाठी 150 तर घरगुतीसाठी 700 मुर्ती बनवल्या आहेत. याकरिता गेल्या 6 महिन्यापासून 10 कामगारांचे हात राबत आहेत. शिवाय मूर्तीसाठी आवश्यक असणाऱ्या पीओपी, कात्या, मॉडेल याकरिता 10 लाखांची गुंतवणूक करावी लागली आहे. यंदा कोरोनचे संकट असताना या साहित्यामध्ये 10 टक्यांनी वाढ झाली आहे. सोनवलकर यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून गेल्या तीस वर्षांपासून पहिल्यांदाच अशी वेळ ओढावली आहे की, मूर्ती तयार करीत असतानाच त्यांना विक्रीची चिंता सतावत आहे.
सार्वजनिक मंडळांना आवश्यक असणाऱ्या मोठ्या मूर्त्यांमधूनच चार पैसे पदरात पडतात पण यंदा त्यांनी 4 फुटांपेक्षा मोठी मूर्ती बनवलेली नाही. आता गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. पण उत्सवादरम्यान काय स्थिती राहते, यावरच सर्वकाही अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बनवलेल्या मुर्ती आद्यपही तशाच आहेत. त्याप्रमाणेच गणेश मूर्तींची स्थिती होऊ नये एवढीच अपेक्षा ते व्यक्त करीत आहेत.
गेल्या चार महिन्यापासून सबंध देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे विघ्नहर्ताने हे कोरोनाचे संकट दूर करावे आणि हा सार्वजनिक उत्सव धडाक्यात पार पडवा हीच अपेक्षा मूर्तीकार व्यक्त करीत आहेत. लातुरातील मुर्तीला लातूर शहरासह मुरुड, उस्मानाबाद, अंबाजोगाई या ठिकाणाहून मागणी असते यंदा काय स्थिती राहणार याच चिंतेत मूर्तीकार आहेत.