लातूर - दीड महिन्यानंतर सोमवारी एका दिवसासाठी का होईना जिल्ह्यातील दारू दुकाने उघडण्यात आली होती. दुकांनासमोरील गर्दी पाहून हे तळीराम अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी रस्त्यावर आलेत का, असा सवाल उपस्थित केला होता. मात्र, हे खरेच आहे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे. कारण सोमवारच्या एका दिवसात हजारो लिटर दारूची विक्री झाली होती. यामधून 35 लाखाचा उत्पादन कर राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे.
4 मे रोजी लॉकडाऊमध्ये शिथीलता आणण्यात आली होती. यामुळे, सोमवारी लातूर जिल्ह्यातील दारूची दुकाने खुली करण्यात आली. एका दिवसात जिल्ह्यात देशी दारूची 14 हजार 948 लिटर, विदेशी 4 हजार 366 तर बिअरची 2 हजार 578 लिटरची विक्री झाली आहे. यामधून 39 लाख 50 हजाराचा महसूल राज्य सरकारला मिळाला आहे.
दिवसभरात 8 तासच दुकाने खुली होती. दरम्यान, पोलीस कारवाई आणि गर्दीने होणारा अडथळा यामुळे नेहमीपेक्षा कमीच विक्री झाल्याचा अंदाज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, नागरिकांची गर्दी आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा यामुळे पुन्हा ही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.