लातूर - एक ना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर शेतकऱ्यांच सोयाबीन बाजारपेठेत दाखल होऊ लागले आहे. उत्पादन कमी हाऊनदेखील लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 50 हजार क्विंटलची आवक होत आहे. तर दुसरीकडे सरकारने सुरू केलेली हमीभाव केंद्र ही ओस पडली आहेत. याला कारण म्हणजे हमीभाव केंद्रावरील कमी भाव आणि नियम, अटींची टांगती तलवार होय. सध्या जिल्ह्यात मंजूर असलेली 15 सोयाबीन खरेदी केंद्र ही नावालाच सुरू आहेत. सोयाबीनच्या दृष्टीने लातूरची बाजारपेठ महत्वपूर्ण आहे. मात्र, बाजारपेठेतील सोयाबीन हमीभावाचे नेमके वास्तव काय? यासंदर्भात 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला विशेष आढावा
हमीभाव केंद्रे ही नावालाच सुरू-
नाफेडच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हमीभाव केंद्रावर सोयाबीनला 3 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल दर आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4 हजार 100 दर मिळत आहे. सरकारने हमीभावाचा दर ठरविला असला तरी यंदा शेतकऱ्यांची झालेली अवस्था आणि आर्थिक स्थिती लक्षात घेता दरात वाढ होणे गरजेचे होते. पण बाजारभावापेक्षा कमी भाव दिल्याने जिल्ह्यातील 15 हमीभाव केंद्रे ही नावालाच सुरू आहेत. आतापर्यंत एकही पोत्याची आवक या केंद्रावर झालेली नाही.
दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहनांच्या रांगाच-रांगा आहेत. केवळ जिल्ह्यातूनच नाही तर उस्मानाबाद, बीड, नांदेड या भागातूनही सोयाबीनची आवक होत आहे. दिवसाकाठी 50 हजार क्विंटल सोयाबीन आवक लातूरच्या उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत आहे. शिवाय दिवसेंदिवस दर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे हमीभाव केंद्रावर केवळ फेडरेशनचे कर्मचारी उपस्थित आहेत. दिवसाकाठी एकही शेतकरी याकडे फिरकत नाही.
नियम अटीमुळे नाराजी-
हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांना शेतीमाल घालण्यापूर्वी नोंद करावी लागत लागते, सात-बारा, 8 अ ची पूर्तता केल्या शिवाय मलाचा दर्जा आणि पैसे मिळण्यासाठी होत असलेली दिरंगाई यामुळे शेतकाऱ्यांध्ये प्रचंड नाराजी आहे. तर दुसरीकडे बाजार समितीमधील आडत्यांकडून शेतकऱ्यांना उचल मिळते, पैसे त्वरित पदरी पडतात. यामुळे शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे हमीभाव केंद्राचा उद्देश साध्य होईल का नाही, याबाबत साशंका उपस्थित होत आहे. लातूर जिल्ह्यात 15 हमीभाव केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत एकही शेतकरी या हमीभाव केंद्राकडे फिरकलेला नाही.