लातूर - जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जेवळी या गावाच्या शिवारात शिकऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जाळ्यात अडकल्यामुळे बिबट्याच्या पायाला मोठी जखम झाली होती. त्यामुळे उपचार आणि पाण्याअभावी बिबट्याचा मृत्यू झाला.
बुधवारी सायंकाळी जेवळी शिवारात गावकऱ्यांना मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. मागील २ वर्षांपासून हा बिबट्या या भागात अनेक वेळा दिसून आला होता. त्यामुळे वन विभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते. मात्र, एकदाही तो वन विभागाच्या जाळ्यात सापडला नाही. मात्र, आता शिकाऱ्याच्या सापळ्यात अडकून या बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
या ठिकाणी मृत बिबट्याला पहाण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी वन विभागाला आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत.