लातूर - सेवालय आणि सामाजिक संस्थामुळे अनेक अनाथांचे जीवन घडल्याची अनंत उदाहरणे आहेत. लातूरतील सेवालायमुळे केवळ जीवनच घडले नाहीतर अनेकांचे संसारही थाटले आहेत. रवी बापटले यांनी एका मुलाला घेऊन सुरू केलेल्या सेवालयात आज ८५ एड्सग्रस्त मुला-मुलींना आधार मिळत आहे. तर, याच परिसरात आत्तापर्यंत २० जणांचे विवाह पार पडले आहेत. आज जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून माहेरवाशी आलेल्या मुलींशी 'ईटीव्ही भारत' ने बातचीत केली, तेव्हा मन हेलकावून टाकतील अशा बाबी समोर आल्या आहेत. १२ वर्षांपूर्वी एचआयव्ही ग्रस्त बालकांसाठी सुरू केलेले सेवालाय आता 'हॅप्पी इंडियन व्हिलेज' या नावाने ओळखले जाऊ लागले आहे.
एड्सग्रस्त मुलांची दयनीय अवस्था पाहून रवी बापटले यांनी शहरापासून जवळच हासेगाव येथे एका झोपडीत या सेवालायची सुरूवात केली होती. आज या सेवालायचे रूपांतर एका गावात (व्हिलेजमध्ये) झाले असून त्याला हॅप्पी इंडियन व्हिलेज या नावाने ओळखले जाते. या सेवालयात ८५ मुले-मुली वास्तव्यास असून, त्यांचे विवाह करून राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. तर, मुलांच्या हाताला काम मिळावे म्हणून परिसरातच उत्तम शेती केली जात आहे.
हेही वाचा - पाणी परिषद : लातूरकरांना मिळणार जलसंवर्धनाचे धडे
रवी बापटले यांच्या संकल्पनेतून स्वप्नवत असलेली वास्तू आता प्रत्यक्षात अवतरली आहे. सुरूवातीच्या काळात त्यांना या कार्यात बरीच विघ्न आलीत, काही समाजकंटकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज त्यांच्या समाज कार्यातील सातत्यामुळे आज या सेवालयाला आपली ओळख मिळणे शक्य झाले आहे. समाजातील विविध घटकांकडून मदत मिळत असल्याने हे सेवालय सुरळीत सुरू आहे. तर, मुलांकडूनही विविध स्पर्धेत आणि क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली जात आहे. त्यामुळे, ११ एकरच्या या परिसरात हे 'हॅप्पी इंडियन व्हिलेज' साकारले आहे. आज जागतिक एड्स दिनानिमित्त सेवालायत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर समाजातील विविध घटकांडून मदतीचा ओघ सुरू होता.
हेही वाचा - राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीच्या सत्ता, लातुरात मात्र 'आघाडी'लाच लखलाभ