लातूर - कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी हा अडचणीतच आला आहे. मात्र, रेणापूरच्या शेतकऱ्याने उसासारखे नगदी पीक बाजूला ठेऊन पाच एकरात 15 लाख 58 हजार रुपयांचे भाजीपाल्याचे उत्पन्न मिळविले आहे. बाजारपेठेतील दर आणि उत्पादनातील फेरबदल यातून गोविंद पाटील या शेतकऱ्याने यशस्वी शेतीची किमया साधली आहे.
रेणापूर हा मांजरा नदीकाठचा परिसर आहे. या ठिकाणी उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. साखर कारखाने जवळच असल्याने उसाची लागवड ही ठरलेलीच असते. मात्र, सर्व काही असतानाही गोविंद पाटील यांनी वेगळी वाट निवडली. दरवर्षी उसाच्या लागवडीमुळे जमिनीचा दर्जाही निकृष्ट होत आहे. तसेच पारंपरिक शेतीमुळे उत्पादनात घटही झाली होती. त्यामुळे गोविंद पाटील यांनी भाजीपाला उत्पादनाला प्राधान्य दिले होते.
![मिरची लागवड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ltr-01-bhajipala-shetitun-utpadan-ready-to-air-7204537_31102020103522_3110f_00364_595.jpg)
भाजीपाल्याला मिळतोय चांगला दर-
यंदाही दोडक्याच्या उत्पादनातून दीड-दोन लाखांचा फटका त्यांना सहन करावा लागला. मात्र, अपयशाने खचून न जाता दोडक्यात झालेले नुकसान इतर भाजीपाल्यातून भरून काढण्याचे त्यांनी ठरिवले. यामुळेच त्यांनी उर्वरित 4 एकरात कोबी, मिरची आणि भोपळ्याची लागवड केली. दरम्यान, झालेल्या अतिवृष्टीमुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाली पण भोपळा, कोबी यातून लाखोंचे उत्पन्न पाटील यांनी घेतले आहे. पावसानंतर भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळेच कोबी व मिरचीला चांगला दर मिळत आहे.
शेतमालात सातत्य असणे महत्त्वाचे-
केवळ बाजारभाव आणि उत्पादनातील फेरबदल यामुळेच हे शक्य झाले आहे. एखाद्या उत्पादनातून आर्थिक नुकसान झाले तर शेतकरी त्याकडे पाठ फिरवतो. त्यामुळेच ऐन बाजारभाव चांगला असताना शेतकऱ्यांकडे शेतीमाल नसतो. त्यामुळे सातत्य असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आजच्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही लाखोंचे उत्पन्न शक्य असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
बेरोजगारांच्या हाताला काम-
टाळेबंदीमध्ये अनेकांच्या हातची कामे गमवावी लागली आहेत. पण गोपाळ पाटील यांच्या पाच एकराच्या भाजीपाल्याच्या फडात कायम 8 ते 10 मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. त्याचे वेगळेच समाधान शेतकरी पाटील यांना आहे. लातूर येथे काम करणारे अनेक मजूर गावी परतले होते. उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना अनेकांना पाटील यांच्या शेतामध्ये काम मिळाले आहे.
दोडक्याचे नुकसान इतर तीन भाजीपाल्यातून
टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात गोविंद पाटील यांनी दोडक्याची लागवड केली होती. पण बदलते वातावरण आणि पाण्याची टंचाई यामुळे दीड एकरातील दोडका हा त्यांना बांधावर टाकावा लागला होता. पण हताश न होता दोडक्यात झालेले नुकसान इतर भाजीपल्यातून काढण्याचा निर्धार पाटील यांनी केला. वावरात कोबी, मिरची, भोपळा असून चार दिवसाला काढणी सुरू आहे. त्यामुळे तोट्यात असलेली शेतीही फायद्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ संयम आणि सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
पाच एकरमधून मिळविले 15 लाख 58 हजार रुपये!
एक एकरमध्ये मिरचीची लागवड केली होती. यामध्ये पाटील यांना 24 टन मिरचीचे उत्पन्न मिळाले. तर 12 हजार रुपये टन असा दर मिळाला होता. एकूण 12 लाख 48 हजाराचे उत्पन्न मिळाले. याकरिता त्यांना 4 लाख रुपये खर्ची करावे लागले आहेत. मिरचीतून त्यांना 8 लाख 48 हजार निव्वळ नफा झाला आहे. कोबीतून 6 लाख 40 हजार उत्पन्न झाले आहे. तर याकरिता 1 लाख 30 हजार एवढा खर्च झाला आहे. कोबीतून त्यांना 5 लाख 10 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे . तर भोपळ्यातून 2 लाख रुपये पाटील यांना मिळाले आहेत. वर्षाकाठी 24 तास शेतात राबून जे उत्पन्न उसातून मिळत नाही. उसापेक्षा जास्त भाजीपाल्यातून त्यांनी 15 लाख 58 हजार मिळविले आहेत.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे.