लातूर - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरातील मोर्चे, आंदोलने याला खऱ्या अर्थाने यश मिळाले असून आज आरक्षण न्यायालयात टिकले आहे. यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले असून लढ्याला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया लातूरकर व्यक्त करीत आहेत. उच्च न्यायालयात आरक्षणसंदर्भातील सर्व याचिका फेटाळताच येथील शिवाजी चौकात जल्लोष करण्यात आला.
मराठा आरक्षणासाठी गल्लीपासून राज्याच्या राजधानीपर्यंत मोर्चे, आंदोलने काढण्यात आले होते. अनेक अडचणींचा सामना करीत हे आरक्षण मिळाले असून आता खऱ्या अर्थाने समाजाला न्याय मिळणार आहे. आर्थिक दृष्ट्या मागासलेपण हा मुद्दा गौण असून शैक्षणिक, सामाजिक दृष्टया आरक्षण हे महत्वाचे होते. त्यामुळे हा लढा यशस्वी झाल्याचे मत अॅड. उदय गवारे यांनी व्यक्त केले.
येथील शिवाजी चौकात मराठा समाज बंधूंच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करीत मिठाई वाटून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देऊन निर्णयाचे स्वागत करण्यात आले. शिवाय हा लढा कुण्या एकाच नसून याकरीता बलिदान देणाऱ्यांचेही तेवढीच महत्वाची भूमिका असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नोकरी आणि शिक्षण यामध्ये १२ ते १३ टक्के मर्यादा आणली पाहिजे, असे कोर्टाने म्हटले आहे. मात्र याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे १६ टक्केच आरक्षण मिळणार असल्याचे मत लातूरकरांनी व्यक्त केले आहे. शहरातील शिवाजी चौकात मराठा समाजबांधव एकत्रित येऊन त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.