लातूर - वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लातूर जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा सील आहेत. पोलिसांना एक संशयित दुचाकीस्वार लातूर-उस्मानाबाद हद्दीवर आढळून आला. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने दुचाकी ही चोरीची असल्याचे कबूल केले आणि त्याचे सर्व बिंग फुटले.
अजय राजेंद्र काळे हा मूळचा औसा तालुक्यातील कार्ला गावचा तरुण आहे. बुधवारी लातूरहून उस्मानाबादकडे मार्गस्थ होत असलेल्या या तरुणाची दुचाकी ही चोरीची असल्याचा संशय नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी आला होता. याबाबत अधिक चौकशी केली असता ही दुचाकी तर चोरीची आहेच शिवाय त्याने आतापर्यंत 13 दुचाक्या चोरी केल्या असल्याची कबुली दिली.
पुणे येथून चोरी करून दुचाकी आणायची आणि लातूर जिल्ह्यात त्याची विक्री केली जात होती. आतापर्यंत त्याने 8 लाख किमतीच्या 13 दुचाकी चोरी केल्या आहेत. किल्लारी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे. 13 गाड्याही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या चोरीमध्ये अजयला अजून कुणाची मदत होती का याची चौकशी सुरू आहे.
सदरील कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शिंदे, गौतम भोळे, आबासाहेब इंगळे, गणेश यादव, उमाकांत चपटे यांनी केली आहे.