लातूर - मुलांच्या शाळेतील प्रवेश प्रक्रियेसाठी आज हजारो रुपये मोजावे लागतात. वाढती महागाई आणि शिक्षणाच्या खर्चाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा प्रतिकूल स्थितीत एमडीए महाराष्ट्र ग्रामीण शैक्षणिक विकास प्रकल्पाअंतर्गत पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासाठी केवळ १ रूपया प्रवेश शुल्क घेतले जाईल. यामुळे राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यात पहिले संकूल लातूर तालुक्यातील कोळपा येथे सुरू होत असल्याचे ऑपरेटिंग ऑफिसर आनंद रामसामी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.
एमडीए दिविजा अमृत फाऊंडेशन शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कोळपा येथे २ हजार विद्यार्थ्यांना केवळ १ रुपयात प्रवेश घेऊन १२ वी पर्यंतचे शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यातील सर्व प्रवेशपात्र मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शासनाने हे कार्य हाती घेत पाऊल उचलल्याचे ऑपरेटिंग ऑफिसर आनंद रामसामी यांनी सांगितले.
महाराष्ट्र ग्रामीण शैक्षणिक विकास, असे या प्रकल्पाचे नाव आहे. यात ३६ जिल्ह्यात आणि ३५५ तालुक्यात शैक्षणिक क्रांती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी केला आहे. पहिल्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या संकुलात २ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. आर्थिक अडचणीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी पात्रता असताना शिक्षणापासून वंचित राहतात. नेमका हाच मुद्दा घेऊन अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे हा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षण केवळ १ रुपयात करता येणार आहे.
सध्याची महागाई आणि शिक्षणाचे झालेले बाजारीकरण यामुळे १ रुपयांत प्रवेश हे जरी अवास्तव वाटत असले येथील संकुलात प्रत्यक्ष प्रवेशास सुरवात झाली आहे. एवढेच नाही तर कोळपा येथील संकुलात अत्याधुनिक सर्व सोई-सुविधा देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे एमडीए फाऊंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संकुलाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.