लातूर - शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला मृतसाठ्यात असलेल्या या धरणात आता 224.93 दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न मिटला आहेच शिवाय येथील एमआयडीसी आणि शेतीलाही आता पाणी मिळणार आहे.
लातूर शहराला कधी 8 दिवसातून तर कधी 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढावली होती. कारण पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ 16 दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यंदा मात्र, समाधानकारक पाऊस झाल्याने उशिरा का होईना धरण भरले आहे. यापूर्वी 2016 साली हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, त्यांनतरही लातूरकरांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते.
लातूरकरांची चिंता मिटली -
मांजरा धरण हे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत असले तरी याचा पाणीपुरवठा हा लातूर शहराला तर होतोच शिवाय एमआयडीसी आणि मांजरा नदीकाठच्या शेतीलाही केला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नदेखील आता मिटला आहे. पाण्याचा येवा असाच सुरू राहीला तर धरणातून विसर्ग करावा लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे. गेल्या चार वर्षांपासून लातूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. आता पाण्याचा योग्य वापर करणेही तेवढेच गरजेचे आहे.
अशी मांजरा धरणाची स्थिती -
मांजरा धरणाचा एकूण साठा हा 224 दलघमी आहे.यापैकी 176.963 दलघमी हा उपयुक्त साठा असून 47.130 दलघमी एवढा मृतसाठा आहे. सध्या पूर्ण क्षमतेने धरण भरलेले आहे.
हेही वाचा - ...अन व्ही. एस पँथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अडवला राज्यमंत्री बनसोडे यांचा ताफा
हेही वाचा - मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून; लातूर येथील घटना