लातूर - देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. लातूर जिल्ह्यातही हे प्रमाण वाढत असून, गेल्या 15 दिवसांपासून ऑरेंज झोनमध्ये असलेला लातूर जिल्हा अखेर आज (रविवार) रेडझोनमध्ये गेला आहे. उदगीर शहरात नव्याने 5 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकट्या उदगीर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही 27वर गेली आहे.
25 एप्रिलला उदगीरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. यामध्येच 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत 27 रुग्णांची भर पडली असून या सर्वांवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात रविवारी 51 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी दाखल झाले होते. यापैकी उदगीर येथून 33 नमुने होते पैकी 5 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पूर्वीचे 22 आणि रविवारी नव्याने आढळून आलेले 5 त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 27 वर गेली असून लातूर जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. उदगीर शहराची संचारबंदी आता 17 मेपर्यंत राहणार आहे.
दिवसेंदिवस उदगीर शहराचा धोका वाढत असून प्रशासनही हतबल झाले आहे. उदगीर वगळता जिल्ह्यात इतरत्र एकही रुग्ण नसला तरी आता सतर्कता बाळगणे गरजचे झाले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 36 झाली असून यापैकी एकाचा मृत्यू तर 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 27 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.