लातूर - मराठवाड्यातील शैक्षणिक माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या लातूर लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी २ हजार ७५ मतदान केंद्रावर तब्बल ८ हजार ३०० कर्मचारी रवाना झाले आहेत.
जबाबदारी आणि प्रक्रियेविषयी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन -
जिल्हाभरातून सर्व कर्मचारी हे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले होते. यावेळी मतदान केंद्रावरील जबाबदारी आणि प्रक्रियेविषयी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक लागणारे साहित्य घेऊन मतदान केंद्रावर जाण्यासाठीची लगबग सुरू होती.
लातूर मतदार संघात १८ लाख ८३ हजार ५३४ मतदार -
कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ३५५ वाहने दाखल झाली आहेत. हे सर्व कर्मचारी मतदान केंद्रावर दुपारी२ नंतर रवाना होणार आहेत. लातूर मतदार संघात १८ लाख ८३ हजार ५३४ मतदार आहेत. त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया राबवून लोकशाहीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक कर्मचारी तयारीला लागले आहेत.