लातूर - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद होती. मात्र, लातूर हे ग्रीनझोनमध्ये आल्यानंतर शेतीशी निगडित उद्योगधंद्यांसाठी लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीत आज शेतीमाल खरेदीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी केवळ 50 शेतकऱ्यांचा माल घेण्यात आला होता. मंगळवारी केवळ तुरीचे सौदे झाले असून व्यवहार झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊनमुळे खरीपासह रब्बी हंगामातील शेतीमालाची साठवणूक करण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण हे ठप्प झाले होते. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि व्यवहार व्हावे या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्यात आली आहे. मात्र, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियम ठरवून दिले होते. एका दिवशी एकाच शेतीमालाचे सौदे होणार. केवळ 50 शेतकऱ्यांचा माल घेण्यास परवानगी असणार. शेतीमालाच्या गाडीसोबत एकाच व्यक्तीला प्रवेश. सकाळी 9 वाजेपर्यंत एकाच ठिकाणी सौदे केले जाणार, असे नियम ठरवून देण्यात आले होते. मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात वाहनांना सोडण्यात आले होते. 50 शेतकऱ्यांच्या 250 क्विंटल तुरी आज दाखल झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आता रोज एका मालाचे सौदे होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार दुपारी 4 पर्यंतच सुरू राहणार आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाली असली तरी सोशल डिस्टन्स आणि ठरवून दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यात आली होती.
20 एप्रिलपासून काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता येणार असल्याचे समजताच सोमवारी शहरात नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे आज शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.