लातूर - शहर कोरोनाच्या विळख्यात आहे. शहरातील प्रत्येक भागात कंटेन्मेंट झोन असून सध्या 91 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे असतानाच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. प्रादुर्भाव टाळावा यादृष्टीने गुरुवारपासून 5 दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे.
जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, नांदेड येथील शेतकऱ्यांचे व्यवहार हे लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत होतात. मात्र, शेतमालाचे दर काढणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बाजार समिती बंद ठेवण्याचे ठरले होते. मात्र, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली नव्हती. बुधवारी रात्री उशिरा याबाबत निर्णय झाला. तसेच खरिपातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे बी-बियाणे खरेदीसाठी होणारी वर्दळही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर याचा फारसा परिणाम होणार नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तीन दिवस बाजार समिती बंद होती, तर आता पुढील 5 दिवस व्यवहार ठप्प राहणार आहेत. बाजार समितीमध्ये व्यापऱ्यांसह जिल्ह्यातून आणि परजिल्ह्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सभापती ललित शाह यांनी सांगितले आहे.