लातूर - माकणी पाणीपुरवठा योजनेला अंतरिम मंजुरी मिळाली असून आठवड्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून माकणी धरणातून औसा शहराला पाणीपुरवठा करणारी योजना रखडली होती. त्यामुळे औसा शहराला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत होता.
लातूर जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका औसा शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा पाणीप्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने रविवारी संबधीत अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून या योजनेला 45 कोटी रुपयांची अंतरिम मंजुरी घेऊन 8 दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. त्यामुळे किमान आता तरी शहराचा पाणीप्रश्न मिटेल असा आशावाद निर्माण झाला आहे.
हे ही वाचा - मुख्यमंत्र्यांची घोषणा जुनीच मात्र, नव्या जोमात; लातुरात चर्चेला उधाण
सध्या शहराला पाणी विकत घेवून तहान भागवावी लागत आहे. यासाठी अनेकदा आंदोलने, मोर्चे झाले होते. रविवारी अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रश्न मार्गी लावला असल्याचे सांगितले. औसा येथील जाहीर सभेत त्यांनी राज्य सरकारने गेल्या 5 वर्षात केलेली कामे आणि भविष्यातील संकल्प हे जनतेसमोर मांडले.
हे ही वाचा - भाजपात प्रवेश केला म्हणजे तिकीट मिळेलच असे नाही; मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
दरम्यान, औसा येथे टाळ-मृदंगच्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. शिवाय औसा मतदार संघातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. विनायक पाटील, आ. सुधाकर भालेराव, अभिमन्यु पवार यांची उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील ही शेवटची सभा घेऊन मुख्यमंत्री उस्मानाबाद जिल्ह्याकडे रवाना झाले.
हे ही वाचा - मिशन विधानसभा : मुख्यमंत्री दोन दिवसात पाच विधानसभा मतदारसंघांना देणार भेट