लातूर - एड्स सारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या मुलांसाठी हसेगाव येथे 'हॅप्पी इंडियन व्हिलेज'नावाचे पुर्नवसन केंद्र उभारण्यात आलेले आहे. याच ठिकाणी आता 'हॅप्पी होम'ही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या सेवालयात एड्सग्रस्त मुलांचे संसार थाटण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी दहा जोडप्यांसाठी घरे बांधण्यात आली असून दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि लेखक अरविंद जगताप यांनी या घरांचे उद्घाटन केले.
एड्सने ग्रासलेल्या मुलांचे जीवन आनंदमयी होण्यासाठी बारा वर्षांपूर्वी औसा तालुक्यातील हसेगाव येथे रवी बापटले यांनी 'हॅपी इंडियन व्हिलेज' नावाने सेवालय उभे केले होते. या ठिकाणी अनेक मुले मोठी. यातील काहींचे संसारही येथेच सुरू झाले. या सेवेलयाला सध्या 84 जण वास्तव्यास असून यातील दहा जणांचे विवाह रवी बापटले यांनी केले आहे. या जोडप्यांना संसारिक जीवन जगता यावे, या उद्देशाने लोकसहभागातून ही घरे उभारण्यात आली.
हेही वाचा - लोकशाही धोक्यात आणू नका, 'या' मुद्द्यावर अण्णांनी सरकारचे खेचले कान
नॉर्मल आयुष्य असतानाही अनेकजण आत्महत्येचा अवलंब करतात. मात्र, एड्सने ग्रासलेल्या मुलांच्या समोर मृत्यू असूनही ही मुले आनंदाने जगत आहे. यातून सर्वसामान्य लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. या मुलांचे जीवन माझ्यासाठी प्रेरणादायी असून भविष्यात संधी मिळाली तर माझ्या चित्रपटात नक्कीच यांना काम देईल, असे आश्वासनही मंजुळे यांनी मुलांना दिले.
लेखक अरविंद जगताप यांनी या मुलांचे भरभरून कौतुक केले. सेवालयाचे संस्थापक रवी बापटले यांनी मागील 12 वर्षातील संघर्षाचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. सेवालयातील विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विविध कलागुण उपस्थितांसमोर सादर केले.