लातूर- हंगामाच्या सुरवतीपासून वरुणराजाची लातूरवर अवकृपा राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असून भर पावसाळ्यात तब्बल 40 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परतीचा पाऊस लातूरकरांसाठी दिलासादायक ठरत आहे. शुक्रवारी सायंकाळी लातूर शहर, ग्रामीण तसेच औसा तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. रात्री 9 च्या दरम्यान शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र अजून पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
हेही वाचा- ऑनलाईन कॅम्पेनद्वारे देणगी मिळवण्यात 'वंचित' सर्वात आघाडीवर
पावसाच्या लहरीपणाचा फटका यंदाही लातूरकरांना सहन करावा लागला आहे. एकीकडे पूरस्थिती तर मराठवाड्यात दुष्काळ कायम आहे. यामध्येच लातूरकरांना अधिकच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पावसाअभावी खरिपाचे पीक हातचे गेले असून शेतकऱ्यांना चिंता आहे ती जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची. मात्र, गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने दिलासा दिला आहे. शुक्रवारी दुपारी औसा, निलंगा, किल्लारीसह लातूर शहर आणि ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली होती. यामुळे पाणीसाठ्यात तर वाढ होईलच शिवाय आगामी रब्बी हंगामासाठी देखील हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ 60 टक्के पाऊस झाला आहे. शिवाय अनियमित वेळी पाऊस झाल्याने त्याचा फायदा पिकांना झालाच नव्हता. यामुळे सोयाबीन या मुख्य पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र, गत आठवड्यापासून परतीच्या पावसाने का होईना हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पावसामध्ये सातत्य राहण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.