लातूर - सात दिवसांच्या आमरण उपोषणानंतरही औसा येथे 'छावा' संघटनेचे विजय घाडगे पाटील हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांवर ठाम आहेत. 25 ऑगस्टपर्यंत शासनाने निर्णय न घेतल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा 'छावा'चे कार्यध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला आहे. उपोषणानंतरही प्रशासनाकडून निर्णय घेतला जात नसल्याने आता हे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे.
शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या घेऊन संबंध मराठवाड्यात 'छावा' संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला विविध संघटना आणि पक्षाने पाठिंबाही दिला आहे. मात्र, प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज संघटनेचे कार्यध्यक्ष नानासाहेब जावळे आक्रमक झाले.
जावळे म्हणाले, आतापर्यंत महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन केले तरी प्रशासनाने दखल घेतलेली नाही. पोलिसांकडूनही आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास 'छावा'च्या कार्यकर्त्यांकडून आत्मदहन केले जाईल. तर, ते स्वतःदेखील लातूरातील शिवाजी चौकात आत्मदहन करतील.