लातूर - उद्योग व्यवसायासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे म्हणून एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विरोधात सासरच्या ५ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील लिंगदाळ येथे घडली.
लिंगदाळ येथील शिल्पा यांचा ८ मे २०१७ ला चाकूर तालुक्यातील येनगेवाडी येथील रामेश्वर मरे यांच्याशी झाला होता. दरम्यान, विवाहाप्रसंगी ठरवण्यात आलेला हुंडाही सासरच्या मंडळींना दिला होता. असे असतानाही संसाराला वर्ष पूर्ण होताच सासरच्या मंडळीने उद्योग व्यवसायासाठी माहेरहून १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. याकरता नवरा रामेश्वर मरे यांच्या बरोबर सासु-सासरे आणि नणंद यांनी शारिरीक आणि मानसिक छळ केल्याचे शिल्पा यांनी तक्रारीत म्हटले आहे. लग्नात ठरल्याप्रमाणे हुंडा दिल्यामुळे आता अधिकची रक्कम देणे अशक्य असल्याचे सांगताच शिल्पा मरे यांना लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. दरम्यान, याबाबतची तक्रार येथील पंचायत समितीमध्ये महिला समुपदेशन केंद्रात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार सासरच्या मंडळींना नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, असे असतानाही २७ जानेवारीला शिल्पा व त्यांच्या आई-वडिलांना १० लाखाची मागणी करत मारहाण करण्यात आली होती. यावरून सासु वंदना विनायक मरे, सासरे विनायक व्यंकटी मरे, नणंद महानंदा नरसिंग यलनाटे, नणंद अश्विनी आवळे, पती रामेश्वर मरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.