लातूर - अहमदपूर येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने जामीन मंजूर करण्यास मदत करतो म्हणून गुन्हेगारालाच लाच मागितल्याचा धक्कायदायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लाचलूचपत विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. उल्हास सखाराम चव्हाण हे अहमदपूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून सेवा बजावत आहेत.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, की एका ३४ वर्षीय दुकानदारावर एका गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तुरुंगवारी न करू देता थेट जामीन मंजूर करण्यासाठी उल्हास चव्हाण यांनी दुकानदाराकडे ५ हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती १ हजार रूपये स्वीकारताना चव्हाण यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले त्याच ठाण्यात या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. पोलीस निरीक्षक भुजंग गोडबोले, एकनाथ गंगातीर्थ, गणेश तालकोकुलवार, दर्शन यादव या लाचलूचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.