लातूर - कोरोनाचे संकट टाळण्यासाठी एक ना अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. जगासमोर हे संकट उभे ठाकले आहे. सध्या तरी लागलीच हे संकट दूर होईल, असे वाटत नाही. त्यामुळे नागरिकांनी जीवनशैलीत बदल करूनच कोरोनाचा सामना करणे ही काळाची गरज झाली असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या प्रभावी अंमलबजावणी नंतरही हे संकट कायम आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 61 रुग्ण आढळून आले होते. पैकी 30 जणांवर उपचार करून सोडण्यात आले आहे, तर 29 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 16 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. 2020 वर्ष हे सावध राहण्याचे आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता असली तरी फिजिकल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. शिवाय परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यात प्रवेश करताच त्यांनी आरोग्य तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या उपाययोजना आणि जिल्हा प्रशासनाने केलेले आवाहन यामुळे कोरोनाचा सामना कसा करायचा याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आवश्यक तो बदल जीवनशैलीत करून कोरोनाशी दोन हात करणे गरजेचे आहे. दुसरीकडे लसीचे संशोधन सुरू असले तरी आद्यपही योग्य तो तोडगा निघालेला नाही. नागरिकांनी सतर्क राहणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचेही यावेळी देशमुख म्हणाले. पत्रकार परिषदेत माजी आमदार वैजिनाथ शिंदे, ललीत शहा, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मोईज शेख यांची उपस्थिती होती.