लातूर - कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीमुळे पुण्यात अडकून पडलेल्या दोन मुलांनी थेट लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशी संपर्क साधला. दोघांची आई शिरूरअनंतपाळ तालुक्यातील येरोळ या गावी आजारी असल्याचे कळवले. यानंतर पालकमंत्र्यांनीही रुग्णवाहीकेसह वैद्यकीय पथक पाठवून त्या रुग्ण महिलेवर तातडीने तेथेच उपचार केले आहेत.
शिरूरअनंतपाळ तालुक्यातील येरोळ गावचे रहिवासी नरसिंग लोंढे यांच्या पत्नी जमुनाबाई लोंढे या आजारी आहेत. त्यांची माधव व उद्धव ही दोन्ही मुले नोकरीनिमित्त पुण्यात राहतात. नरसिंग लोंढे यांनी आपली पत्नी आजारी असल्याचे पुणे येथे स्थायिक असलेल्या मुलांना सोमवारी कळवले. आई आजारी असल्याचे समजल्यानंतर दोन्ही मुले तातडीने पुण्यावरून लातूरला निघाले. मात्र, करोनाला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे त्यांना पुण्यातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. मुलांनी दूरध्वनीवरून लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशी थेट संपर्क साधला आणि आईच्या आजारपणाबद्दल त्यांना माहिती दिली. पालकमंत्री यांनी त्यांना धीर देत तुम्ही सुरक्षित रहा, आईची काळजी करू नका त्यांच्यावर योग्य उपचार होतील, असे सांगितले. त्यानंतर लातूर येथील शासकीय आरोग्य यंत्रणा व डॉक्टरांशी संपर्क करून या संदर्भातील माहिती दिली व लोंढेवर आवश्यक ते सर्व उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार डॉ. अभिषेक वाघमारे वैद्यकीय पथकासह रुग्णवाहीकेद्वारे येरोळ गावी पोहोचले आणि जमुनाबाई लोंढे यांच्यावर उपचार केला. आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - गावात येणाऱ्यांचा मुक्काम शेतावरच; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा ठराव