लातूर - टंचाईच्या काळात पाण्याचे नियोजन करुन शेतकऱ्यांनी बाग जोपासली. प्रसंगी हातऊसणे पैसे घेऊन माल बाजारपेठेत दाखल करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे पायपीठही केली. मात्र हे सर्व करूनही अखेर द्राक्ष मातीमोलच होणार असल्याचे आता संचारबंदीने पुढे आले आहे. यासारखे दुर्देव ते काय ? आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळ, गारपीठ यासारख्या संकटावर मात केली. मात्र, ऐन द्राक्ष बागाची निर्यांत होण्याच्या प्रसंगीच कोरोनाने असे घेरले आहे, की यामध्ये द्राक्ष उत्पादक उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. माल तयार असून देखील सध्याच्या संचारबंदीमुळे वाहतूकच ठप्प आहे. त्यामुळे किल्लारी परिसरातील शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका सहन करावा लागणार आहे.
औसा तालुक्यातील किल्लारी परिसर निर्यातदार द्रक्ष म्हणून ओळखला जातो. गतवर्षी पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जात शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करीत ठिबकसिंचनाचा वापर केला होता. शिवाय आर्थिक संकटात असलेल्या बागायतदरांनी पैशाची जुळवाजुळव करुन तळहाताच्या फोडाप्रमाणे बागाची जोपासणा केली. यामधून कोट्यवधीचा फायदा होईल, अशी स्वप्ने शेतकरी रंगवत होता. व्यापाऱ्यांनी बागा पाहून पसंतीही दर्शिवली. आता तोड होणार म्हणताच कोरोनाचे संकट घोंगावत आले आणि काही दिवसातच होत्याचे नव्हते झाले.
कोरोनाबद्दल देश-विदेशात चर्चा होत असताना त्याचा परिणाम थेट शेताततील बागावर होईल, याची थोडीही कल्पना शेतकऱ्यांनी केली नव्हती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता देशभर संचारबंदी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नसला, तरी त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक देशोधडीला लागले आहेत. वाहतूक ठप्पच असल्याने द्राक्षाच्या बागा अजूनही वावरातच आहेत. या भागातील द्राक्ष हे निर्यांत होत असतात. मात्र, व्यापारी फिरकतच नसल्याने, घडाने लगडलेल्या बागा शेतातच आहेत. त्यामुळे आता काय करावे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. द्राक्ष निर्यांतीसाठी सरकारने मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.