लातूर - निलंगा तालुक्यातील नदीहत्तरगा येथे अन्नातून तिघांना विषबाधा झाली. यानंतर तिन्ही भावाडांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील १२ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. या मुलांना घरच्या अन्नातूनच विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नदीहत्तरगा येथील सिकंदर सुर्यवंशी यांच्या दोन मुली व मुलाला रविवारी रात्री जेवनानंतर उलट्या- जुलाब याचा त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना किल्लारी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले.
सुर्यवंशी कुटुंबीय काही दिवसांपूर्वीच मुंबईहून गावी परतले होते. त्यामुळे, मुलीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, सुर्यवंशी कुटुंबीय तेरा दिवस क्वारंटाईन होते. यानंतर त्यांचे अहवालही कोरोना निगेटिव्ह आले होते. त्यामुळेच हा प्रकार विषबाधेमुळेच घडल्याचे समोर आले. यात १२ वर्षीय दिव्या सिकंदर सुर्यवंशी हिचा मृत्यू झाला आहे. तर, इतर दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.