लातूर - यंदा जिल्ह्यातील गणेश उत्सवावर दुष्काळाचे सावट होते. मात्र, गणेश भक्तांनी उत्सहामध्ये कमी न करता काल (रविवार) उदगीर येथील ७ दिवसांच्या बाप्पांना ढोल-ताशांच्या गजरात निरोप दिला. पोलीस प्रशासनाच्या डॉल्बी बंदला प्रतिसाद देत येथील मनाच्या आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक दुपारी १ च्या सुमारास मार्गस्थ झाली होती.
ढोल-ताशा अन् लेझिम पथकाच्या पारंपारिक वाद्याच्या सानिध्यात परंपरेनुसार सातव्या दिवशी गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीस मोठ्या उत्साहात सुरवात झाली. मानाच्या आजोबा गणपतीची येथील चौबारा चौकात जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, संजय बनसोडे यांच्याहस्ते महापूजा करून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. गेल्या सात दिवसांपासून विविध देखावे सादर करून मंडळांनी उदगीरकरांची मने जिंकली होती.
हेही वाचा - लातुरात रेल्वेने पाणी आणल्याचे बील पालिकेच्या माथी, मदत केल्याचे बील कसे मागता - आमदार अमित देशमुख
विसर्जन मिरवणूक हे गणेशभक्तांचे आकर्षण राहते. यंदा दुष्काळाचे सावट असतानाही मंडळाने विविध देखावे आणि पारंपरिक वाद्यांच्या सानिध्यात या मिरवणुकीला सुरवात केली होती. या मनाच्या गणपतीनंतर शहरातील ५४ मंडळातील मिरवणुकीस सुरवात झाली. विसर्जन मार्गावर आजोबा या मनाच्या गणपतीचे जागोजागी स्वागत करण्यात आले. मिरवणूकी दरम्यान ८०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते. सार्वजनिक गणेश विसर्जनात शहरातील ५४ मंडळांनी सहभाग नोंदिवला होता. येथील मक्कापूर चौकात नगरपालिकेच्या वतीने सर्व मंडळाचे स्वागत करण्यात आले आहे.